January 25, 2026

lollipop Entertainment

Lights Camera Action

‘पिफ्फ’मध्ये ‘बाप्या’ने पटकावले तीन मानाचे पुरस्कार

मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व गौरवाचा क्षण ठरत आहे. २४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) २०२६ मध्ये ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’ विभागात अधिकृत निवड झालेल्या आगामी मराठी चित्रपट ‘बाप्या’ ने आता थेट तीन मानाचे पुरस्कार पटकावत महोत्सवात दैदिप्यमान यश मिळवले आहे.

‘बाप्या’ ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा सन्मान मिळाला असून, आपल्या दमदार आणि सहज अभिनयाने प्रेक्षक व परीक्षकांची मने जिंकणाऱ्या गिरीश कुलकर्णी यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ , तर संवेदनशील भूमिकेतील उत्कृष्ट सादरीकरणासाठी राजश्री देशपांडे यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ची कथा दापोलीतील एका लहान मासेमार कुटुंबाभोवती फिरते. कुटुंबातील नातेसंबंध, समाजाचा दृष्टीकोन आणि वैयक्तिक संघर्ष यांचा हळुवार वेध घेणारी ही गोष्ट भावनिक संवेदनशीलता, विनोद आणि सामाजिक भाष्य यांचा सुंदर समतोल साधणारी आहे. मुक्तल तेलंग आणि समीर तिवारी निर्मित या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दिग्दर्शक समीर तिवारी म्हणतात, “ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मंचावर ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ आणि ‘ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हे तिन्ही पुरस्कार मिळणे, हे आमच्यासाठी अत्यंत सन्मानाचं आणि प्रेरणादायी यश आहे. गिरीश आणि राजश्री यांनी आपल्या अभिनयाने पात्रांना आत्मा दिला आहे. या चित्रपटावर विश्वास ठेवणाऱ्या संपूर्ण टीमचे हे सामूहिक यश आहे.”