November 14, 2025

lollipop Entertainment

Lights Camera Action

पूर्णा आजी परत येणार! ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी 

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका

ठरलं तर मग मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. ठरलं तर मगच्या टीमलाही ज्योती ताई आपल्यातून निघून गेल्याचं दु:ख पचवणं आजही अवघड जातंय. पण शो मस्ट गो ऑन….गेले कित्येक दिवस पूर्णा आजी या पात्राला प्रेक्षक मिस करत होते. प्रेक्षकांच्या इच्छेखातर पूर्णा आजी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहेत.

पूर्णा आजी म्हणजेची रोहिणी ताई म्हणाल्या, ‘ठरलं तर मग मालिका माझी आवडती मालिका आहे आणि मी न चुकता पहाते. याच मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे. मनात संमिश्र भावना आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहे. पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्यासोबत माझी जुनी मैत्री होती. कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन. कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते. त्या कलाकाराने केलेलं काम पुढे न्यायचं थोडं जबाबदारीचं काम आहे. माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे स्वीकारावं ही इच्छा आहे.’

पूर्णा आजीच्या एण्ट्रीने सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या टीमने मिळून रोहिणी ताईंचं मनापासून स्वागत केलं आहे. सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, पूर्णा आजीच्या रुपात रोहिणी ताईंना पाहून खूप भरुन आलं. रोहिणी ताईंसोबत काम करताना खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यांच्या रुपात विद्यापीठच आमच्या सेटवर आलंय. रोहिणी ताई म्हणजेच पूर्णा आजीसोबत आता मालिकेची गोष्ट पुढे नेताना आनंद होतोय. तेव्हा पाहायला विसरु नका ठरलं तर मग रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.