स्टार प्रवाहवर ४ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अपूर्वा ही व्यक्तिरेखा साकारते आहे. याचनिमित्ताने ज्ञानदाशी केलेली ही खास बातचित
- ज्ञानदा ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशिल?
मी या मालिकेत अपूर्वा ही व्यक्तिरेखा साकारते आहे. अपूर्वा ही अतिशय लाडावलेली मुलगी आहे. मॉडर्न विचारांची आणि प्रचंड उत्साही. सुरुवातीला अपूर्वाची एनर्जी मॅच करणं मला थोडसं अवघड गेलं. आता हळूहळू मी अपूर्वामध्ये समरसून गेली आहे. याआधी अश्या पद्धतीची व्यक्तिरेखा मी साकारलेली नाही. त्यामुळे अपूर्वा साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे.
- ज्ञानदा आणि अपूर्वामध्ये काही साम्य आहे का?
ज्ञानदा आणि अपूर्वामध्ये अजिबात साम्य नाही. अपूर्वाला मॉडर्न आणि टीपटॉप रहायला आवडतं. माझ्यासाठी कम्फर्ट फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी ज्यात कम्फर्टेबल असेन असे कपडे घालणं मी पसंत करते. त्यामुळे अपूर्वा या भूमिकेच्या निमित्ताने मला एक नवं पात्र जगायला मिळत आहे.
- ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून नेमकं काय सांगायचं आहे?
मालिकेचं नाव ऐकता क्षणीच मी त्याच्या प्रेमात पडले होते. एकत्र कुटुंबाचं महत्त्व पटवून देणारी ही मालिका आहे. ज्याप्रमाणे एक एक ठिपका जोडून सुंदर रांगोळी तयार होते. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक सदस्यामुळे कुटुंब तयार होतं. त्यामुळे ठिपक्यांची रांगोळी हे मालिकेचं नाव अतिशय समर्पक असं आहे.
- मालिकेतल्या तुझ्या सहकलाकारांविषयी काय सांगशिल?
मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजते की मला इतक्या दिग्गज कलाकारांचा सहवास लाभतो आहे. शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे यांच्यासोबत एकाच मालिकेत काम करायलं मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. यासर्वांच्या सहवासात खूप नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. या सर्वांचे सीन पहाणं ही माझ्यासाठी पर्वणी असते. आम्हा सर्वांची खूप छान गट्टी जमली आहे. पडद्यामागची ही केमिस्ट्री पडद्यावरही दिसेल याची मला खात्री आहे. त्यासाठी पहायला विसरु नका ठिपक्याची रांगोळी ४ ऑक्टोबरपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
More Stories
अभिनेत्री चैत्राली गुप्ते लेकीसोबत छोट्या पडद्यावर
“देवमाणूस” मध्ये झळकणार दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणेची जोडी
मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग: ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार नाट्यगृहात प्रदर्शित