
मुंबई — कलर लाईन आर्ट्स निर्मित संगीतमय प्रेमकथा ‘सरगम A Musical Love Story’ या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. प्रेक्षक, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि उद्योगातील मान्यवर अशा सर्वांच्या उपस्थितीने प्रीमियरसाठी रंगतदार वातावरण निर्माण झाले होते.

या प्रीमियरमध्ये चित्रपटातील प्रमुख कलाकार रुत्विक केंद्रे, सुमीत पुसावळे, भक्ती धुमाळ, संजय भूरे, रूपलक्ष्मी शिंदे यांच्यासह चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शिव कदम, तसेच निर्माण संस्थेचे प्रमुख उपस्थित होते. प्रीमियरमध्ये दाखवलेल्या दृश्यसंपदा, संगीत आणि कलाकारांच्या प्रभावी अभिनयाला उपस्थित मान्यवरांनी आणि पाहुण्यांनी दाद दिली.

चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या महान कलाकार गिरीश कर्नाड यांच्या योगदानामुळे सरगम ला मिळालेली भावनिक खोली आणि सिनेमॅटिक वजन प्रेक्षकांच्या मनात खोलवर उमटताना दिसले.

प्रीमियरनंतर अनेक प्रेक्षकांनी चित्रपटाबद्दल उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. विशेषतः अविनाश–विश्वजीत यांनी दिलेलं संगीत, गुरू ठाकूर यांनी लिहिलेली अर्थपूर्ण गीते आणि कथानकातील भावनिक प्रवास यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

दिग्दर्शक शिव कदम यांनी प्रीमियरनंतर आनंद व्यक्त करत म्हणाले,
“सरगम हा आमच्या टीमसाठी आत्मीयतेने केलेला प्रवास आहे. प्रीमियरला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी मोठं प्रोत्साहन आहे.”

सरगम – A musical love story, हा चित्रपट १४ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.


More Stories
‘सरगम’चा ट्रेलर प्रदर्शित १४ नोव्हेंबरला संगीतमय प्रवासाची सुरुवात
प्रेमाच्या हळव्या भावनांना स्पर्श करणारं ‘सावरताना…’ गाणं प्रदर्शित
‘ह्युमन कोकेन’ – वास्तव कल्पनेपेक्षा अधिक भयानक असलेला थरारक अनुभव