कधी कधी एखादं चित्रच खूप काही सांगून जातं… शब्दांशिवाय भावना व्यक्त करतं… आणि ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर मधून नेमकं हेच दिसतं. नातेसंबंधांवर भाष्य करणारा ‘माया’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, पहिल्याच नजरेत ते मनाला स्पर्श करून जातं. हे पोस्टर केवळ चित्रपटाची झलक देत नाही, तर नात्यांमधील जिव्हाळा, तडे, अंतर आणि स्वीकार यांचा अर्थपूर्ण संवाद घडवून आणत आहे.

मोशन पोस्टरमध्ये वेगवेगळ्या पिढ्यांतील सदस्य एकत्र दिसतात. त्यांच्या नात्यांमधील समजूतदारपणा, आपुलकी, अंतर आणि तरीही टिकून राहाणारी माया हे भाव अतिशय शांतपणे मांडण्यात आल्याचे दिसतेय. पोस्टरमध्ये मुक्ताच्या हातात दिसणारा तुटलेला कप हा केवळ अपघाताने तुटलेली वस्तू नसून, तो नात्यांमधील तडे, न बोललेली दुःखं आणि आयुष्यात येणारी पोकळी दर्शवतोय. तो कप पाहाताना मनात सहज प्रश्न पडतो, एखादं नातंही असंच नकळत तुटलेलं आहे का? ज्याच्या कडा अजूनही हातात आहेत, पण ते पूर्वीसारखं पूर्ण राहिलेलं नाही? हातात तुटलेला कप असतानाही मुक्ताच्या चेहऱ्यावरचं शांत, हलकंसं हास्य हे दुःख नाकारत नाही, तर स्वीकारत आहे, असे प्रतीत करतेय.
या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” ‘माया’ म्हणजे फक्त प्रेम नाही, तर एकमेकांना समजून घेणं, स्वीकारणं आणि काळाच्या ओघातही नातं जपणं. आयुष्यात सगळंच नीटनेटके असतं असं नाही. काही गोष्टी तुटतात, काही नाती बदलतात. मुक्ताच्या हातातील कप त्याचेच प्रतीक आहे, तर तिचं हास्य स्वीकाराचं. या मोशन पोस्टरमधून आम्हाला चित्रपटाची भावना शब्दांशिवाय पोहोचवायची होती.”
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित ‘माया’ चित्रपटाचे डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार, नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपट मुक्ता बर्वे, गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

More Stories
स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम
देवखेळचा ट्रेलर प्रसिद्ध – पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ
निर्माता दिग्दर्शक अभिनेता आदिनाथ कोठारे साठी 2026 आहे खास !