January 24, 2026

lollipop Entertainment

Lights Camera Action

स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळतोय. विशेष करुन या मालिकेतील लहानग्या सावित्रीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सावित्रीबाईंचा ठाम निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ, अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या सगळ्या गुणांचा प्रत्यय लहानग्या सावित्रीने साकारलेल्या प्रत्येक प्रसंगात जिवंत होते. ही भूमिका साकारणारी गुणी बालकलाकार तक्षा शेट्टी हिने आपल्या सहज अभिनयातून सावित्रीबाईंचं बालपण अतिशय प्रामाणिकपणे साकारलं आहे.तिच्या निरागस डोळ्यांत दिसणारा प्रश्नार्थक भाव, अन्यायाविरोधात उभं राहण्याची धडपड, शिक्षणासाठी असलेली आंतरिक जिद्द आणि स्वप्न पाहण्याचं धाडस या सगळ्यांतून भावी क्रांतीची चाहूल मिळते.

सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखलेही छोट्या सावित्रीचा अभिनय पाहून भारावून गेली आहे. छोट्या सावित्रीचं कौतुक करताना मधुराणी म्हणाल्या, ‘छोट्या सावित्रीची चुणूक आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी लागणारी ऊर्जा तक्षाने सहजरित्या पकडली आहे. मला प्रचंड अभिमान वाटतो तिचा अभिनय पहाताना. तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा माझ्याच छोट्या रुपाला भेटल्याचा भास झाला. इतक्या लहान वयातही तिची मेहनत, तिचं शिस्तबद्ध काम, तिची मेहनती वृत्ती आणि प्रत्येक सीनबद्दलची तळमळ खरंच वाखाणण्यासारखी आहे. ती फक्त भूमिका साकारत नाही, तर ती ती भूमिका मनापासून जगते. हे खरंच वाखाणण्यासारखं आणि कौतुकास्पद आहे. असंच आमच्या मालिकेला प्रेम देत रहा आणि न चुकता पहा मी सावित्रीबाई जोतीराव फुले सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.