January 23, 2025

lollipop Entertainment

Lights Camera Action

अभिनेत्री चैत्राली गुप्ते लेकीसोबत छोट्या पडद्यावर

‘अशोक मा.मा.’च्या माध्यमातून शुभवीचं मालिकाविश्वात पदार्पण

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर 25 नोव्हेंबरपासून ‘अशोक मा.मा.’ ही मालिका सुरू झाली आहे. अल्पावधीतच ही मालिका धुमाकूळ घालत आहे. अशोक मामांसह मालिकेतील सर्व तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे बॉलिवूडप्रमाणेच मराठमोळी अभिनेत्री चैत्राली गुप्तेच्या लेकीने आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या मालिकेच्या माध्यमातून अभिनयाची वाट धरली आहे. शुभवी गुप्तेने मालिकाविश्वात पदार्पण केलं असून तिला पहिलंच काम अशोक सराफ यांच्यासोबत करण्याची संधी मिळाली आहे. तसेच पदार्पणातच तिच्या आईच्या भूमिकेत तिची खऱ्या आयुष्यातील आई चैत्राली गुप्ते आहे. ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत शुभवी गुप्ते अशोक सराफ यांच्या नातीची संयमीची भूमिका साकारत आहे. चैत्राली आणि शुभवीची ऑनस्क्रीन धमाल पाहायला प्रेक्षकांनाही मजा येत आहे.

चैत्राली गुप्ते म्हणाली,”लेकीच्या पहिल्याच मालिकेत मला तिच्या आईचं पात्र साकारायला मिळालंय. त्याचवेळी समाधानदेखील आहे की शुभवीला महानायक अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून शुभवीसोबत काम करताना खूपच मजा येतेय. कारण तिचा प्रत्येक दिवस वेगळा आहे. ती मेहनत घेतेय, तिचे कष्ट दिसत आहेत. चांगलं काम करण्याचा तिचा प्रयत्न आहे. त्यामुळे आनंद आहे.”.

अशोक मामांबद्दल बोलताना चैत्राली म्हणाली,”अशोक मामांकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. त्यांच्याकडून वेळेत महत्त्व खूप शिकण्यासारखं आहे. दिलेल्या कॉलटाईमआधी ते सेटवर हजर असतात. ही शिस्त त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. मालिकेत जसं शिस्त म्हणजे शिस्त आहे तसं ते नकळत सांगतात की, शिस्तीत राहा आणि शिस्तीतच सगळी कामे करा. तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. वेळेत येणं, चोख काम करणं हे आम्ही सगळे त्यांच्याकडून शिकत आहोत”.

शुभवी गुप्ते आपल्या पहिल्या मालिकेबद्दल बोलताना म्हणाली,”अशोक मा.मा.’ या मालिकेत माझ्या आईच्या भूमिकेत माझी खरी आहे. पण ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खरं सांगायचं तर काही वेगळं नाही. जसं आम्ही दोघी आमच्या घरी वागतो तसंचं आम्हाला मालिकेत करायचं आहे. पहिल्यांदा मला जेव्हा कळलं की आईसोबत काम करावं लागणार आहे तेव्हा मला भीती वाटत होती की, तिच्यासमोर कसं करायचं. पण हळूहळू सीन यायला लागले तसं भीती वाटणं कमी झालं. माझ्यासाठी ही मालिका म्हणजे नक्कीच एक मोठी संधी आहे. अशोक मामांसोबत काम करायला मिळतंय. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत”.