September 9, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

अभिनेत्री ‘शिवानी सुर्वे’ झळकणार निर्माते ‘दिपक राणे’ यांच्या नव्या सिनेमात

आजपासून सिनेमागृह सुरू करण्यात येत आहेत, त्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा सुगीचे दिवस पाहायला मिळतील यात काही शंका नाही. त्याच मुहूर्तावर नव्या सिनेमांच्या घोषणा देखील होत आहेत. लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे ही लवकरच निर्माते दिपक राणे यांच्या नव्या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात शिवानीसोबत अजून कोणकोणते कलाकार असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यात आहे.

गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीनंतर ‘बिग बॉस मराठी’ हा रिएलिटी शो तिने केला. २०१६ ला शिवानी ‘घंटा’ सिनेमात झळकली. त्यानंतर २०१९ मध्ये अभिनेता अंकुश चौधरीसोबतच्या ‘ट्रिपल सीट’ सिनेमात ती दिसली. शिवाय २०२० मध्ये तिला चार मानाचे नामांकित पुरस्कार मिळाले. त्यात सिटी सिने अवॉडर्समध्ये शिवानीला ‘ट्रिपल सीट’ सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच तिचा चाहता वर्ग ही अफाट आहे.

अभिनेत्री शिवानी सुर्वे तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगते, “मी या सिनेमासाठी फारच उत्सुक आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ही कथा ऐकली. त्यानंतर मी क्षणाचाही विलंब न लावता त्वरीत होकार कळवला. खरंतर या सिनेमातील माझी भूमिका खूपच चॅलेंजींग आहे. आणि मी पहिल्यांदाच माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी चॅलेंजींग करणार आहे. सध्या मी सिनेमातील भूमिकेची तयारी करत आहे. तर या सिनेमाच शुटींग लवकरच सुरू होईल.”

आता अभिनेत्री शिवानी सुर्वे या सिनेमात कोणत्या भूमिकेत दिसेल हे पाहाणं, तिच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचं ठरेल.