September 9, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

एकाहून एक धम्माल गाण्यांनी सज्ज ‘पांडू’ चित्रपटाचे संगीत प्रकाशित !

मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊन आणि पॅंडेमिकच्या चक्रात अडकलेलं मनोरंजन क्षेत्र आता हळूहळू खुलं होत आहे. सिनेमगृहे, नाट्यगृहे उघडल्यामुळे विविध कलाकृती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काहीशा तणावाच्या या वातावरणात प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचा थोडासा ताण दूर करण्यासाठी झी स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘पांडू’ हा निखळ विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मराठी सिनेसृष्टीत विनोदी चित्रपटांची एक मोठी परंपरा आहे. दादा कोंडके यांचे चित्रपट असो की सचिन-अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट, यातील विनोदाबरोबरच त्याचेही गाण्यांनी, संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली. विनोद आणि संगीताची हीच परंपरा कायम राखण्याचं काम ‘पांडू’ही करणार आहे.

एकाहून एक धमाल गाण्यांनी सज्ज असलेल्या या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच थाटात पार पडला. यावेळी चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी यांच्यासह दिग्दर्शक विजू माने, झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी आणि संगीतकार अवधूत गुप्ते उपस्थित होते. यासोबतच गीतकार समीर सामंत गायक आदर्श शिंदे, गायिका वैशाली सामंत, अबोली गीऱ्हे यांचीही उपस्थिती होती.

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने म्हणाले, पांडू सिनेमाच्या टीमची जुळवाजुळव सुरू असताना माझ्या मनात एकच नाव संगीतकार म्हणून अगदी शंभर टक्के फिट होतं ते म्हणजे अवधूत गुप्ते. सुदैवाने निर्मिती संस्था झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी आणि अश्विन पाटील यांचादेखील विचार तसाच होता. या सिनेमाच्या संगीताची एक आत्यंतिक गरज होती ती म्हणजे मातीची नाळ असणे. आणि अवधूत गुप्तेंच्या कुठल्याही गाण्यात महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा वास येतोच. चित्रपट संगीत क्षेत्रात गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी प्रचंड ऊर्जा असलेलं संगीत गरजेचं होतं. तेही जर अस्सल मराठी मातीशी नातं सांगणारं असेल तर लोकांना नवचैतन्य देऊन जाऊ शकेल. पांडू सिनेमातील गाणी मला श्रवणीय व्हायला हवी होती. अवधूत गुप्ते यांनी ती केवळ श्रवणीय नव्हे, तर अविस्मरणीय केली आहेत.

याप्रसंगी बोलतांना झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी म्हणाले की, लॉकडाऊननंतर कोणत्या चित्रपटाने सुरुवात करावी असा विचार मनात येताच पटकन ‘पांडू’ हेच नाव समोर आलं. मागच्या दोन वर्षांत आपण अनेक अप्रिय घटनांचा सामना केलाय. आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे या काळात प्रेक्षकांचा ताण हलका करण्यासाठी आणि हास्याचं , सकारात्मकतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी हा ‘पांडू’ आम्ही घेऊन येतोय.”

चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले की, “दिग्दर्शक विजू माने यांनी जेव्हा या चित्रपटाची संकल्पना ऐकवली तेव्हाच मी अतिशय उत्साहाने कामाला लागलो. चित्रपटाची गोष्ट ऐकायला जातानाच मी यातील ‘दादा परत या ना’ हे गाणं तयार करून घेऊन गेलो होतो. हा अल्बम करणं हे खूप आव्हानात्मक होतं. कारण यात वेगवेगळ्या संगीत प्रकारातील गाणी करायची होती. सुदैवाने मला समीर सामंत, वैभव जोशी यांच्या सारखे प्रतिभावान गीतकार मिळाले. वैशाली सामंत, आदर्श शिंदे सारख्या उत्कृष्ट गायकांची साथ मिळाली. या सर्वांच्या योगदानामुळे यातील सर्वच गाणी बहारदार झाली आहेत.”

सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या आणि सोशल मीडियावर लाखाहुन अधिक व्ह्यूव्ज मिळवलेल्या ‘बुरुम बुरुम’ गाण्याबद्दल गुप्ते म्हणाले की, “मी पुण्याला जात असतांना यातील धम्माल रोमँटिक गाण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात एक बुलेट माझ्या गाडीजवळून गेली आणि तिचा आवाज ऐकून ‘बुरूम बुरूम’ हे दोन शब्द डोक्यात आले आणि त्यावरच पुढचं गाणं रचलं.” याशिवाय केळेवाली गाणं करतानाही धमाल आली असंही ते म्हणाले. यावेळी ‘केळेवाळी’ या गाण्यावर भाऊ कदम आणि सोनाली कुलकर्णी या जोडीने उत्स्फूर्तपणे ठेका धरत नृत्य करून सर्वांची दाद मिळवली.

‘पांडू’ चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘दादा परत याना’ आणि ‘बुरुम बुरुम’ हे गाणं अवधूत गुप्ते यांनी लिहिलं असून त्यांना या गाण्यासाठी अनुक्रमे आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांची साथ मिळाली आहे. याशिवाय सर्वांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ‘जाणता राजा’ हे गीत समीर सामंत यांनी लिहिलं असून त्याला अबोली गिऱ्हे या नव्या गायिकेसोबत आदर्श शिंदेचा रांगडा आवाज लाभला आहे. ‘बॅडलक खराब हाय’ या गाण्याचे शब्द वैभव जोशी यांचे असून ते रामानंद उगळे यांनी गायलं आहे तर ‘केळेवाली’ हे गीत विजू माने यांनी लिहिलं असून ते अवधूत गुप्ते आणि संपदा माने यांनी गायलं आहे.

एकंदरीत विविध रंगांच्या आणि ढंगाच्या गाण्यांनी परिपूर्ण असलेला ‘पांडू’ चित्रपटाचा हा म्युझिक अल्बम सर्वांनाच भावणार अशी खात्री यावेळी सर्वांनी व्यक्त केली.