September 9, 2024

lollipop Entertainment

Lights Camera Action

ओटीटीवर घुमणार शिवप्रताप गरुडझेपची गर्जना

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सिरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. मनोरंजनाच्या या नव्या रुजणार्‍या व्यासपीठावर अधिराज्य गाजवण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या डॉ.अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपल्या यशाची पताका फडकवली. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक पसंतीची जोरदार पावती मिळवल्यानंतर आता ‘टीएफएस प्ले’ (TFS PLAY ) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाची गर्जना घुमणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरला या चित्रपटाचा वर्ल्ड वाईड ओटीटी प्रिमियर ‘टीएफएस प्ले’ (TFS PLAY) या अॅपवर  रंगणार आहे. ‘टीएफएस प्ले’ फ्री डाऊनलोड ॲप असून या ॲपवर अवघ्या ९९ रूपयांत आपल्याला हा चित्रपट पाहता येईल.

या प्रदर्शनाबाबत डॉ अमोल कोल्हे सांगतात की, आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. मोठया पडद्यानंतर ओटीटीवर शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाचा प्रिमियर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक माध्यमाची स्वतःची ताकद आणि ओळख आहे. ओटीटीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचेल हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.  

टीएफएस ओरिजिनल हा पहिला कौटुंबिक ओटीटी प्लॅटफॉर्म असून स्क्रीन मिररिंगचा पर्याय यासाठी उपलब्ध असल्याने मोबाईलवरून आपल्या स्मार्ट टीव्हीवरही पाहता येऊ शकतो. ॲपल आणि ॲड्रॉइड टीव्हीवर देखील ‘टीएफएस प्ले’ उपलब्ध आहे.

‘जगदंब क्रिएशन्स’ची निर्मिती असलेल्या शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले असून चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत यतीन कार्येकर,  प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.