प्रेम ही भावना एवढी अमर्याद आहे की, आणि त्याबद्दल कितीही लिहावे तितके थोडेच. प्रेमाची अभिव्यक्ती अनेक रूपांनी होताना आपण पाहतोच. समाजावरील, कुटुंबावरील, व दोन व्यक्तींचे एकमेकांवरील प्रेम अनेक प्रकारांनी व्यक्त होत असते. प्रेयसी आणि प्रियकर यांचे प्रेम पाहता ही प्रेम भावना कधी संपू नयेच असे वाटते. प्रेमी युगुलांमधील प्रेम हे हल्ली बऱ्याच गाण्यांमधून म्हणा वा चित्रपट, मालिकांमधून व्यक्त होताना आपण पाहतोच. सध्याची तरुण पिढी तर या प्रेम भावनेला अधिकच मापात तोलते आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशाच प्रेम भावनेला व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री सायली चौधरी आणि अभिनेता सिद्धार्थ खिरीद ‘प्रेमात तुझ्या’ या प्रेमगीतातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. या दोघांची जोडगोळी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नाटक, मालिकाविश्वात अभिनयाला प्रथम प्राधान्य देणारी सायली चौधरी सर्वानीच पाहिली. ‘देवयानी’, ‘रुंजी’, ‘छत्रीवाली’, ‘सारे तुझ्याच साठी’ यासारख्या बऱ्याच मालिकांमधून तर गलतीसे मिस्टेक या नाटकातून आपला ठसा उमटवित अभिनयासह नृत्याची आवड जोपासत ती नव्याने ‘प्रेमात तुझ्या’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे. सिद्धार्थ खिरीदसह ती या गाण्यात थिरकताना दिसणार आहे. दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात दिग्दर्शित हे गाणे असून या गाण्याचे नयनरम्य चित्रीकरण सागर आंबात यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. तर या गाण्याच्या संकलनाची जबाबदारीही सागर आणि सचिन यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. या गाण्याची कोरियोग्राफी हर्षद वाघमारे याने केली आहे. या गाण्याच्या संगीताची धुरा वरून लिखाते याने सांभाळली असून गाण्याचे बोल मंदार चोळकर लिखित असून श्रुती राणे हिने या गाण्याला आपल्या सुमधुर स्वरात संगीतबद्ध केले आहे.
‘मिहान एंटरटेनमेंट’ आणि ‘व्हिडीओ पॅलेस’ प्रस्तुत ‘प्रेमात तुझ्या’ हे गाणे लवकरच प्रेमाची परिभाषा आणि प्रेमातल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सज्ज होणार आहे. ‘प्रेमात तुझ्या’ म्हणत सायली आणि सिद्धार्थची लव्हेबल केमिस्ट्री पाहणे ही प्रेक्षकांना रंजक ठरेल, यांत शंकाच नाही.
More Stories
“भारतीय ऑलिंपिक इतिहासाचा सुवर्ण प्रवास: २०२४ ची कामगिरी”
“रक्षाबंधनाच्या अनोख्या कथाः परंपरा आणि आधुनिकतेचा संगम”
डबल डेकर मुंबईतून झाली आहे का लुप्त??