January 22, 2025

lollipop Entertainment

Lights Camera Action

यवतमाळची गीत बागडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची महाविजेती

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. विरार येथील जुई चव्हाण, पलाक्षी दीक्षित, पुणे येथील देवांश भाटे, स्वरा किंबहुने, यवतमाळची गीत बागडे आणि संगमनेरच्या सारंग भालके या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता ठरला संगमनेरचा सारंग भालके. विरारच्या पलाक्षी दीक्षितने तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक जुई चव्हाण, देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने यांना विभागून देण्यात आलं. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची विजेती गीत बागडेला पाच लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना गीत बागडे म्हणाली, ‘हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या बाबांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी स्पर्धेत भाग घेऊ शकले. या मंचाने फक्त गाणंच नाही तर मला आत्मविश्वासही दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत सर यांचे विशेष आभार. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. स्टार प्रवाहने मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या रुपात नव्या पाढीसाठी हा मंच खुला करुन दिला आहे त्यांची देखिल मी ऋणी आहे.’

गीत बागडे जरी या पर्वाची विजेती असली तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. या सर्व स्पर्धकांच्या पुढील वाटचालीसाठी स्टार प्रवाह परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा.